बेळगाव : विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी यशाची बातमी समोर आली आहे. बेळगाव येथील स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीच्या तीन विद्यार्थिनींची बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील Guest Service Associate विभागासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल विद्यार्थिनींचा आणि त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अकॅडमीमध्ये आयोजित सत्कार समारंभाला स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बामणे आणि श्री सरस्वती इन्फोटेक, बेळगावच्या व्यवस्थापकीय संचालिका ज्योती विनोद बामणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्यात गौरविण्यात आलेल्या विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे आहेत.
तनुश्री भांडगे — बेळगाव, कर्नाटक
स्नेहा नार्वेकर — दांडेली, कर्नाटक
विद्याश्री कंभार — अलनावर, कर्नाटक
या तिन्ही विद्यार्थिनींनी आपल्या मेहनतीच्या आणि प्रशिक्षणाच्या जोरावर विमानतळावरील सेवा क्षेत्रात संधी मिळवली आहे. त्यांच्या यशामुळे कुटुंबीयांसह अकॅडमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सत्कार समारंभादरम्यान विद्यार्थिनींनी आपले अनुभव व्यक्त केले. अकॅडमीमध्ये प्रवेश घेताना विमान वाहतूक क्षेत्राविषयीचे ज्ञान मर्यादित होते आणि आत्मविश्वासाचाही अभाव होता. मात्र, प्रशिक्षणादरम्यान मिळालेले मार्गदर्शन, कौशल्यविकास आणि प्रोत्साहन यामुळे स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडल्याचे त्यांनी सांगितले.
विशेषतः प्रादेशिक माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींनी मिळवलेले हे यश त्यांच्या पालकांसाठी भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरले. मुलींची प्रगती आणि त्यांना मिळालेली करिअरची संधी पाहून पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याचे अकॅडमीने नमूद केले.
प्रमुख पाहुणे विनोद बामणे यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थिनींचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग्य दिशा, व्यावसायिक प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन दिल्यास ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात, हा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.
स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीच्या या यशामुळे बेळगावसह दांडेली आणि अलनावर परिसरातील विद्यार्थ्यांसाठीही विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत सकारात्मक प्रेरणा मिळाली आहे.

