बेळगाव : कर्नाटकातील शाळांमध्ये रविवारपासून नव्या शैक्षणिक वर्षाचा उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. बेळगाव शहरातील विविध शाळांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात आनंददायी व्हावी यासाठी अनेक शाळांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.
मराठा मंडळाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यामुळे शाळेच्या परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी मराठा मंडळ जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. डी. पाटील, मराठा मंडळ सेंटर हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. एम. पाटील तसेच मराठा मंडळ हायस्कूल, बेळगावचे उपमुख्याध्यापक एम. के. पाटील उपस्थित होते. शिक्षक आणि पालकांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नव्या शैक्षणिक वर्षासाठी प्रेरित केले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला. नवीन मित्र, नवीन वर्ग आणि नवीन शैक्षणिक संधींचे स्वागत करत विद्यार्थ्यांनी नव्या वर्षाची सुरुवात केली.
