बेळगाव
कपिलेश्वर मंदिरामागील कपिलतीर्थ तलाव परिसरात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर या भागाच्या सुरक्षितता आणि विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तरचे आमदार Raju Seth यांनी कोणताही राजकीय वाद न निर्माण करता तलाव परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
रविवारी ३ मे रोजी कपिलतीर्थ तलावात झालेल्या दुर्घटनेत दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तलावालगतच्या काही घरांना तडे जाऊन माती खचण्यास सुरुवात झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली.
या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने आमदार राजू सेठ यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी तलाव परिसराचा विकास, सुशोभीकरण आणि सुरक्षितता यासाठी आपल्या निधीतून सुमारे साडेतीन कोटी रुपये उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली.
तसेच परिसरातील ऐतिहासिक कपिलेश्वर व्यायाम शाळा, समुदाय भवन आणि इतर सार्वजनिक सुविधांचा विकासही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “या परिसरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण मिळावे, हा आमचा उद्देश आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
लवकरच जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी करून विकासकामांना प्रारंभ केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या भेटीदरम्यान महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले तसेच गोडसे कुटुंबीयांच्या वतीने श्रीकांत गोडसे उपस्थित होते.

