बेळगाव :
बेळगाव तालुक्यातील कडोली जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रातील हंदिगनूर गावात वाल्मिकी समाज भवनाच्या बांधकामाला भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली. या भवनासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी योग्य सुविधा मिळाव्यात, हा मंत्री सतीश जारकीहोळी यांचा उद्देश आहे. त्याच अनुषंगाने हंदिगनूर येथे समाज भवन उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.
हे समाज भवन लवकरच पूर्ण होऊन परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल. तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री सतीश जारकीहोळी यांनी हंदिगनूर गावातील सर्व समाजातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. गावातील सिमेंट रस्ते, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि प्रमुख रस्त्यांच्या सुधारणांसह विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, विभागीय अधिकारी, वाल्मिकी समाजाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
