बेळगाव : मंदिरं ही केवळ श्रद्धेची आणि उपासनेची ठिकाणे नसून भारतीय संस्कृती, संस्कार आणि अध्यात्माची केंद्रे आहेत. मंदिरांच्या माध्यमातून समाजातील संस्कार अधिक दृढ करण्याबरोबरच सकारात्मक विचार आणि सामाजिक एकात्मता वाढविण्याची गरज आहे, असे मत कर्नाटक राज्य देवालय संवर्धन समितीचे राज्य संयोजक मनोहरजी मठद यांनी व्यक्त केले.
बेळगाव शहरातील बसव कॉलनी येथील बसवण्णा मंदिरात रविवारी देवालय संवर्धन समितीच्या संयोजकांची व पुजाऱ्यांची दुसरी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून मनोहरजी मठद बोलत होते.
मनोहरजी मठद म्हणाले की, मंदिरांनी केवळ भक्तीची केंद्रे न राहता समाजासाठी शक्ती आणि सकारात्मक परिवर्तनाची केंद्रे बनले पाहिजे. समाजातील अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुती दूर करून मूलभूत श्रद्धा, संस्कार आणि अध्यात्मिक विचार रुजविण्यासाठी मंदिरांमधून विविध उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.
मंदिरांमध्ये नियमित ध्यान, प्रार्थना, भजन, आध्यात्मिक चिंतन आणि विचारमंथन यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणत परस्परांमध्ये प्रेम, आपुलकी आणि बंधुभाव वाढविण्याचे कार्य मंदिरांनी करावे, असेही त्यांनी सांगितले.
समाजातील मत्सर, निराशा आणि नकारात्मकता दूर करून प्रत्येक व्यक्तीबद्दल आपलेपणाची भावना निर्माण झाली पाहिजे. ‘सर्वजण आपले आहेत’ हा विचार समाजात रुजविण्यासाठी मंदिरांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाच्या विविध उपक्रमांना सुरुवात करण्याची योजना असल्याचे मनोहरजी मठद यांनी सांगितले.
पुजारी आणि मंदिर समित्यांसाठी कार्यशाळा
मंदिर समित्यांच्या कार्यपद्धतीबरोबरच मंदिरातील धार्मिक आचार-विचार, पूजा-पद्धती आणि विविध धार्मिक विधी याबाबत समिती सदस्य व पुजाऱ्यांना अधिक माहिती मिळावी, यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
या कार्यशाळेसाठी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस तारीख निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मनोहरजी मठद यांनी दिली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोमशेखर हिरेमठ होते. यावेळी श्रीकांत कद आणि कल्लप्पा गाणिगेर यांच्यासह रामतीर्थनगर, श्रीनगर, बसव कॉलनी, शिवबसव नगर आदी परिसरांतील मंदिर संवर्धन समित्यांचे पदाधिकारी, सदस्य आणि भाविक उपस्थित होते.
यावेळी सी. व्ही. सवडी, सुरेश गणाचारी, एम. सी. पाटील, एस. व्ही. दोडवाड, एस. बी. उर्बिनट्टी, ए. सी. अंगडी, बसवराज कडोलकर, ए. वाय. धामणेकर, बाबू कुलकर्णी, शिवबसप्पा पट्टण, बसवराज गाणगी यांच्यासह विविध मंदिर समित्यांचे सदस्य उपस्थित होते.
सतीश माळवादे यांनी स्वागत केले, तर महेश मावीनकट्टी यांनी आभार मानले.
| D Media









