बेळगाव : २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी कर्नाटक राज्य रायत संघ व हसिरू सेने तसेच कन्नड नाडू राज्य रायत संघाने केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ६ ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
यंदाच्या गाळप हंगामासाठी ऊसाचा दर निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी, साखर मंत्री आणि साखर कारखानदारांची तातडीची बैठक आयोजित करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात ऊस तयार होऊन उभा असताना गाळप हंगाम सुरू होण्यास विलंब होत असल्याने उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे. वेळेत ऊस तोडणी व वाहतूक न झाल्यास पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो, असा मुद्दा संघटनेने निवेदनातून मांडला.
२०२६-२७ हंगामासाठी ऊसाला किमान ₹६ हजारांचा दर निश्चित करावा, अशी प्रमुख मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. ऊस उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा खर्च, वाढलेले शेती खर्च आणि मेहनतीच्या तुलनेत न्याय्य व लाभदायक मोबदला मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
गाळप हंगाम लांबल्यास त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादकांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि संबंधित साखर कारखान्यांनी समन्वय साधून दराचा प्रश्न लवकर निकाली काढावा आणि कारखाने तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
अन्नदात्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी शासनाने विलंब न करता निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

