साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त गडहिंग्लज येथे विविध उपक्रमांनी जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, गडहिंग्लज-चंदगड-आजरा तथा संयुक्त भीमनगर यांच्या वतीने रविवारी, १६ ऑगस्ट रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, संकेश्वर रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात कर्नाटकातील दलित नेते व समाजसेवक मल्लेश चौगुले (बेळगाव) यांचा महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास दलित नेते सुरेश तळवार (हुक्केरी), आरपीआयचे नेते सतीश माळगे (कोल्हापूर) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश
यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य आणि विचारांच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि तळागाळातील घटकांना दिशा दिली, असे त्यांनी सांगितले.
समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणाला प्राधान्य देऊन प्रगती साधावी, तसेच अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांपासून दूर राहावे, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. यावेळी गडहिंग्लज येथे समुदाय भवन आणि अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
‘अण्णाभाऊंचे विचार आजही प्रेरणादायी’
सन्मानाला उत्तर देताना मल्लेश चौगुले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा उल्लेख केला. अण्णाभाऊंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लेखन करत समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली, असे त्यांनी सांगितले.
अण्णाभाऊ साठे यांनी परदेशात रशियात जाऊनही आपल्या विचारांचे आणि साहित्याचे सादरीकरण केले होते, असे सांगत चौगुले यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
समाजातील अनिष्ट रूढी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जागृती आवश्यक असून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाने पुढे जावे, असे आवाहनही त्यांनी केले. शिक्षण घेऊन स्वतःची प्रगती करण्यासोबतच समाजासाठीही योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
‘अण्णाभाऊंचे साहित्य आणि संविधान’ विषयावर व्याख्यान
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. प्रकाश नाईक यांनी ‘अण्णाभाऊंचे साहित्य आणि संविधान’ या विषयावर मार्गदर्शन केले. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा सामाजिक परिवर्तनाशी असलेला संबंध त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडहिंग्लज नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गोडसाखर गडहिंग्लजचे संचालक सतीश पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर, शबनम सय्यद, कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या एससी विभागाचे राज्य संचालक मल्लेश चौगुले, गडहिंग्लज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, गडहिंग्लज पोलिस ठाण्याचे पीआय सतीश होडगर, मातंग समाज बेळगावचे जिल्हाध्यक्ष भरत रोडडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्याध्यक्ष परशुराम हुले, अध्यक्ष लक्ष्मण दावणे (माजी सैनिक), उपाध्यक्ष किरण म्हेत्री, सचिव सुरेश चव्हाण, खजिनदार प्रकाश कांबळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
