बेळगावच्या ऐतिहासिक किल्ला परिसरातील रामकृष्ण मिशन आश्रमाच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आश्रमात रौप्य महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ८ ते १० मे दरम्यान धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार असून, या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्वामी विवेकानंद यांनी ऑक्टोबर १८९२ मध्ये बेळगावमध्ये १२ दिवस मुक्काम केला होता. सुरुवातीला त्यांनी रिसालदार गल्लीतील भाटे यांच्या निवासस्थानी वास्तव्य केले, तर पुढील नऊ दिवस किल्ला परिसरातील हरिपाद मित्र यांच्या घरी ते राहिले होते. त्यांच्या या ऐतिहासिक वास्तव्यामुळे पावन झालेल्या ठिकाणी आज रामकृष्ण मिशन आश्रम कार्यरत आहे.
रौप्य महोत्सव सोहळा रामकृष्ण मठ आणि मिशन बेलूर मठाचे उपाध्यक्ष स्वामी सुहितानंदजी महाराज यांच्या सानिध्यात पार पडणार आहे.
८ मे रोजी कार्यक्रमांची सुरुवात
पहिल्या दिवशी सकाळी ‘श्री रामकृष्ण मननम्’ या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले असून विविध आश्रमांतील स्वामीजी मार्गदर्शन करणार आहेत. दुपारच्या सत्रात डॉ. एस. पी. गुरुदास यांची हरिकथा होणार आहे. सायंकाळी प्रसिद्ध गायिका संगीता कट्टी कुलकर्णी यांचा ‘शरणदास वाणी’ हा संगीत कार्यक्रम रंगणार आहे.
९ मे रोजी शारदा मातांवर व्याख्यान
दुसऱ्या दिवशी ‘श्री शारदादेवी मननम्’ कार्यक्रमात स्वामी सुहितानंदजी महाराज शारदा मातांच्या जीवनकार्यावर विचार मांडणार आहेत. दुपारनंतर निनाद अशोक आणि नृत्य अलंकार रोहित माने यांचे सांस्कृतिक सादरीकरण होणार आहे. सायंकाळी हिंदुस्थानी शास्त्रीय गायक रघुनंदन पणशीकर यांच्या भजनसंध्येने वातावरण भक्तिमय होणार आहे.
समारोपाला सतार वादनाची मेजवानी
१० मे रोजी ‘स्वामी विवेकानंद मननम्’ कार्यक्रमासह पूजा, भजन आणि रामकृष्ण होम यांसारखे धार्मिक विधी पार पडतील. त्यानंतर स्वामी सुहितानंदजी महाराजांचे आशीर्वचन होणार आहे. दुपारच्या सत्रात डॉ. दत्तात्रय वेलणकर आणि डॉ. एच. एन. मुरलीधर स्वामी विवेकानंदांच्या काव्यावर आधारित विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत. समारोपाला प्रख्यात सतारवादक पंडित पुरबयान चटर्जी यांच्या सतार वादनाचा कार्यक्रम होणार आहे.
या तीन दिवसीय महोत्सवाला बेळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रामकृष्ण मिशन आश्रमाचे सचिव स्वामी आत्मप्राणानंद यांनी केले आहे.

