बेळगाव | डी मीडिया न्यूज
गुन्हेगारांवर वचक निर्माण करतानाच नागरिकाभिमुख पोलीसिंगला प्राधान्य देणारे माळमारुती पोलीस ठाण्याचे CPI बी.आर. गड्डेकर यांची स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या राष्ट्रपती श्लाघनीय सेवा पदकासाठी निवड झाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय पोलीस सेवेचा हा गौरव मानला जात असून, बेळगाव शहर पोलीस विभागासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
गड्डेकर यांनी पोलीस सेवेत विविध जबाबदाऱ्या सांभाळताना गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्था, सायबर फसवणूक आणि अमली पदार्थांविरोधातील कारवाईत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
2005 मध्ये PSI म्हणून सेवेला सुरुवात
बी.आर. गड्डेकर यांनी 2005 मध्ये PSI म्हणून पोलीस दलात प्रवेश केला. महालिंगपूर, इळकल आणि माळमारुती पोलीस ठाण्यात त्यांनी काम केले. 2016 मध्ये CPI पदावर पदोन्नती झाल्यानंतर CCB विशेष पोलीस ठाणे, माळमारुती पोलीस ठाणे आणि CEN गुन्हे पोलीस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली. सध्या ते माळमारुती पोलीस ठाण्याचे CPI म्हणून कार्यरत आहेत.
इराणी टोळीविरोधात मोठी कारवाई
दरोडे, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, अमली पदार्थांची तस्करी आणि सायबर फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात गड्डेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
साखळी चोरी करणाऱ्या इराणी टोळीविरोधात कारवाई करत 28 गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांना यश आले. या कारवाईत तब्बल 1 किलो 49 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
CCB मध्ये कार्यरत असताना त्यांनी 59 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत 1 किलो 516 ग्रॅम सोने आणि 3 किलो 308 ग्रॅम चांदी हस्तगत केली.
हिंडलगा कारागृहातील एका कुख्यात गुन्हेगाराची सुटका करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीचा कटही पोलिसांनी उधळून लावला. या कारवाईत पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
सायबर गुन्ह्यांच्या तपासातही उल्लेखनीय काम
सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्येही गड्डेकर यांच्या तपासकौशल्याची प्रभावी नोंद झाली आहे. 2020 ते 2022 या कालावधीत दाखल झालेल्या 133 सायबर आर्थिक फसवणूक प्रकरणांमध्ये आरोपींची बँक खाती गोठवून पीडितांना एकूण ₹4.95 कोटींची रक्कम परत मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
2024 मधील एका डिजिटल अरेस्ट प्रकरणात गुजरातमधून आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात ₹1.11 कोटींची रक्कम फ्रीज करण्यात आली, तर त्यापैकी ₹30 लाख पीडिताला परत मिळवून देण्यात आले.
इंटरनॅशनल फ्रॉड कॉल सेंटरवर धडक
2025 मध्ये अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फसवणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरवर झालेल्या कारवाईतही गड्डेकर यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. या कारवाईत 33 जणांना अटक करण्यात आली.
अमली पदार्थांविरोधातील मोहिमेतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, 50 किलो 452 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेल्या प्रकरणात नऊ आरोपींना अटक करण्यात आली.
गंभीर गुन्ह्यांचा तपास करताना आरोपींना न्यायालयाकडून शिक्षा होईल, अशा पद्धतीने पुरावे संकलित करून तपास पूर्ण करण्याची त्यांची कार्यपद्धती त्यांच्या सेवाकार्यातील आणखी एक महत्त्वाची बाजू मानली जाते.
दीर्घ पोलीस सेवा, गुन्हे उकल, सायबर गुन्ह्यांवरील कारवाई आणि नागरिकाभिमुख पोलीसिंग या कामगिरीची दखल घेत CPI बी.आर. गड्डेकर यांना राष्ट्रपती श्लाघनीय सेवा पदक मिळणार असल्याने बेळगाव पोलीस दलात समाधान व्यक्त होत आहे.
