बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सततच्या पावसाचा विचार करून बुधवार, ८ जुलै रोजी बेळगाव शहर व ग्रामीण परिसर, खानापूर आणि निपाणी तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रौशन यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
