बेळगाव शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता विविध ठिकाणी दिसून येत आहे. सोमवारी फॅमिली कोर्ट परिसरातील एक जुने आणि मोठे झाड अचानक कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सुदैवाने, झाड कोसळताना कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, झाड रस्त्यावर पडल्यामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आणि झाड हटविण्याचे काम हाती घेतले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक जुनाट झाडे धोकादायक बनली आहेत. त्यामुळे अशा झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी अनावश्यकपणे झाडांच्या खाली किंवा धोकादायक ठिकाणी थांबणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
