बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी आयोजित विशेष कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय विधिज्ञ, वरिष्ठ वकील तसेच इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ज्युरिस्ट्स (लंडन) आणि इंटरनॅशनल कमिशन ऑफ रायटर्स (जिनिव्हा)चे अध्यक्ष डॉ. आदिश सी. अग्रवाल यांनी बार असोसिएशनच्या सदस्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हा न्यायालय परिसरातील जुन्या बार असोसिएशन सभागृहात (टी.व्ही. हॉल) दुपारी २ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बेळगाव बार असोसिएशनने सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.
कायदा, न्यायव्यवस्था, आंतरराष्ट्रीय विधी क्षेत्रातील बदल आणि वकिलांची भूमिका या विविध विषयांवर डॉ. अग्रवाल यांनी उपस्थित वकिलांना मार्गदर्शन केले. या संवादातून विधी व्यवसायाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
कार्यक्रमाचे आयोजन बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बी. जे. गंगाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तर सरचिटणीस ॲड. सचिन आर. शिवण्णावर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
