This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Devotional

दत्त जयंती विशेष लेख 

दत्त जयंती विशेष लेख 

दत्त जयंती विशेष लेख

एक सांप्रदायिक जन्मोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.

1. दत्त जयंतीचे महत्त्व – दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते.

2. जन्मोत्सव साजरा करणे – दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. भजन, पूजन आणि विशेषकरून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तामिळनाडूमध्येही दत्त जयंतीची प्रथा आहे. दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो.

दत्तयाग

दत्तयाग यामध्ये पवमान पंचसूक्ताच्या आवृत्त्या (जप) आणि त्याच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने घृत (तूप) आणि तीळ यांनी हवन करतात. दत्तयागासाठी केल्या जाणार्‍या जपाची संख्या निश्चित नाही. स्थानिक पुरोहितांच्या समादेशानुसार जप आणि हवन केले जाते.

पुराणांनुसार जन्माचा इतिहास – अत्रीऋषींची पत्नी अनसूया ही पतीव्रता होती. पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले, ‘‘तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल; म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू.’’ हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, ‘‘एवढी काय मोठी पतीव्रता, सती आहे, ते आपण पाहू.’’

एकदा अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनसूयेने सांगितले, ‘‘ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.’’ तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, ‘‘ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. `आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता’, असे आम्ही ऐकले आहे; म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत.’’ मग अनसूयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, ‘‘तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.’’ त्यावर ‘अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील’, असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, ‘‘मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन. तुम्ही आनंदाने भोजन करा.’’ मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की, ‘अतिथी माझी मुले आहेत’ आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. पहाते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहानबाळे ! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, ‘‘स्वामिन् देवेन दत्तं ।’’ याचा अर्थ असा आहे – ‘हे स्वामी, देवाने दिलेली (मुले).’ यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण ‘दत्त’ असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन ‘वर मागा’, असे म्हणाले. अत्री आणि अनसूयेने ‘बालके आमच्या घरी रहावी’, असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला.

दत्त अवतार

दत्ताच्या परिवाराचा भावार्थ – दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते.

दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून, हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले.

`श्रीपाद श्रीवल्लभ’ हा दत्ताचा पहिला अवतार आणि `श्री नृसिंह सरस्वती’ हा दुसरा अवतार होय. तसेच `माणिकप्रभु’ तिसरे आणि `श्री स्वामी समर्थ महाराज’ हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. जैनपंथीय दत्तगुरूंकडे `नेमिनाथ’ म्हणून पहातात आणि मुसलमान `फकिराच्या वेशात’ पहातात.

दत्त दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत आणि दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात आणि योग गिरनार येथे करीत.

दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे. दत्त हा `गुरुदेव’ आहे. दत्तात्रेयांना परमगुरु मानले आहे. त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते. `श्री गुरुदेव दत्त’, `श्री गुरुदत्त’ असा त्यांचा जयघोष करतात. `दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ ही नामधून आहे.

दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे – झोळी हे मधुमक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.

दत्त जयंती उत्सव भावपूर्ण होण्यासाठी हे करा !

अ. स्त्रियांनी नऊवारी साडी अन् पुरुषांनी सदरा-धोतर / पायजमा अशी सात्त्विक वस्त्रे परिधान करून उत्सवात सहभागी व्हावे.

आ. विद्यार्थ्यांसाठी ‘श्रीदत्तात्रेयकवच’ पठण ठेवावे, दत्ताचा नामजप करवून घ्यावा.

इ. उत्सवाच्या ठिकाणी कर्णकर्कश संगीत लावणे, विद्युत रोषणाईचा झगमगाट यांसारख्या रज-तम निर्माण करणार्‍या कृती करू नयेत.

ई. दत्त जयंतीच्या मिरवणुकीत टाळ, मृदुंग अशी सात्त्विक वाद्ये वापरावीत.

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दत्त’ भाग 1

संकलक – श्री आबासाहेब सावंत ,
संपर्क क्रमांक – 7892400185


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply