बेळगाव | प्रतिनिधी
भोपाळ, मध्य प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या युवा जलतरणपटू ओम व्यंकटेश जुवळीने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओमने वरिष्ठ गटातील 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये तिसरा क्रमांक मिळवत पदकावर आपले नाव कोरले.
ओम हा आबा व हिंद स्पोर्ट्स क्लब, बेळगावचा जलतरणपटू असून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करत त्याने आपल्या कौशल्याची प्रभावी छाप पाडली.
इंटर कॉलेजिएट स्पर्धेत चार पदकांची कमाई
राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीनंतर ओमने कर्नाटक युनिव्हर्सिटी, धारवाड यांच्या आयोजनाखाली झालेल्या इंटर कॉलेजिएट जलतरण स्पर्धेतही दमदार प्रदर्शन केले.
या स्पर्धेत त्याने—
- 🥇 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक – सुवर्णपदक
- 🥈 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक – रौप्यपदक
- 🥈 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक – रौप्यपदक
- 🥈 100 मीटर बॅकस्ट्रोक – रौप्यपदक
अशी एकूण चार पदके मिळवत आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे दर्शन घडवले.
राष्ट्रीय पातळीवर पॅरा स्विमिंगमध्ये कांस्यपदक आणि त्यानंतर इंटर कॉलेजिएट स्पर्धेत चार पदकांची कामगिरी केल्याने ओमच्या क्रीडा प्रवासाला आणखी बळ मिळाले आहे.
प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ओम जुवळी याला NIS प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव आणि रणजीत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. नियमित सराव, तांत्रिक प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक तयारीच्या जोरावर ओमने या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.
तसेच हिंद सोशल क्लबचे अध्यक्ष अरविंद संगोळी, शीतल हुलभत्ते, सचिव शुभांगी मंगळूरकर आणि सावित्री दोड्डणावर यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन त्याला मिळत आहे.
ओमच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्याचे अभिनंदन होत असून, आगामी स्पर्धांमध्येही तो अशीच दमदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

