बेळगाव : शाहूनगर परिसरातील साई कॉलनी येथे विराजमान असलेल्या ‘साई कॉलनी शाहूनगरचा विघ्नहर्ता’ गणरायाची रविवारी भक्तिमय वातावरणात महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमाला बेळगाव जिल्हा काँग्रेस प्रोफेशनल सेलचे जिल्हाध्यक्ष संदेश राजमाने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
संदेश राजमाने यांच्या उपस्थितीत विघ्नहर्ताची विधिवत महाआरती पार पडली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच साई कॉलनी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
साई कॉलनीतील गणेश मंडळाकडून गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन वेळोवेळी केले जाते. सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान मंडळाच्या वतीने प्रमुख अतिथी संदेश राजमाने यांचा सन्मान करण्यात आला. तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल पावशे यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महाआरतीच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले









