बेळगाव : शहराच्या नियोजित आणि सर्वसमावेशक विकासाला अधिक गती देण्याच्या दृष्टीने बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या (BUDA) मासिक बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार तथा बुडाचे अध्यक्ष आसिफ (राजू) सेठ यांच्या अध्यक्षतेखाली बुडाच्या सभागृहात ही बैठक पार पडली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचीही बैठकीला उपस्थिती होती.
बैठकीत बेळगाव शहरासह शहरालगतच्या भागांमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रस्तावित प्रकल्पांची सद्यस्थिती, कामांची प्रगती आणि भविष्यातील विकास आराखड्याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी अधिक वेगाने कार्यवाही करावी, याबाबतही चर्चा झाली.
शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन उपलब्ध निधी आणि संसाधनांचा प्रभावी वापर करणे, विकासकामांच्या अंमलबजावणीला गती देणे तसेच नागरिकांच्या गरजांनुसार प्राधान्यक्रम निश्चित करून कामे हाती घेण्याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
बेळगाव शहराचा नियोजित विकास साधताना विविध विकास प्रकल्पांमध्ये समन्वय राखणे आणि कामांच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
यावेळी बुडा आयुक्त शकील अहमद यांच्यासह प्राधिकरणातील अधिकारी उपस्थित होते.

