राज्य मराठी विकास संस्था व गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधिनींच्या वतीने 26 नोव्हेंबर हा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते व दलित राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष श्री.मल्लेश चौगुले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष व प्रबोधिनीचे सचिव सुभाषराव ओऊळकर उपस्थित होते. व्यासपीठावर प्राध्यापक सुरेश पाटील, मराठी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक एन.सी.उडकेकर, शिक्षण समन्वयक सविता पवार उपस्थित होते. प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.याचबरोबर सांविधानिक मूल्यांच्या फलकाचेही अनावरण करण्यात आले. यानंतर मराठी विद्यानिकेतनच्या मुलांनी पथनाट्य व माहितीच्या संग्रहातून संविधान दिनाचे महत्त्व पटवून दिले.
पथनाटयाचे दिग्दर्शन नील आपटे यांनी केले. संविधान दिनाच्या औचित्याने मराठी विद्यानिकेतनच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची सहल रायगड येथील महाड या ऐतिहासिक ठिकाणी आज उपस्थित होती. या सहलीचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रसारित करण्यात आला. यावेळी सहदेव कांबळे व इंद्रजीत मोरे यांनी चवदार तळ्याच्या काठावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कार्याचा आढावा घेतला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्रमुख पाहुणे मल्लेश चौगुले यांनी शाळेचे अभिनंदन केले.
तसेच फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज आहे विद्यार्थ्यांनी हे विचार आपल्या कृतीतून दाखवावेत असे आव्हानही केले. यावेळी सुभाष ओऊळकर यांनी शाळेमध्ये शैक्षणिक विषयांबरोबरच सामाजिक विषयांचे कोणकोणते उपक्रम आयोजित केले जातात व त्यांची आजच्या काळातील उपयुक्तता याविषयी आपले मत केले. विद्यार्थ्यांनी बदलत्या टेक्नॉलॉजीचा अभ्यासामध्ये उपयोग करून घ्यावा व ती आत्मसात करावी असे आव्हानही केले. मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षिका सरिता बांदेकर यांनी संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाला प्रबोधिनीचे सदस्य बी.बी शिंदे, बसवंत शहापूरकर, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बी.जी.पाटील , धीरज सिंह राजपूत, प्रसाद सावंत गजानन सावंत, श्रुती बेळगावकर ,पद्मजा कुऱ्याळकर , माया पाटील स्नेहल बेळगावकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सविता पवार व आभार धीरजसिंह राजपूत यांनी व्यक्त केले.

