बेळगाव : कंग्राळी बी.के. परिसरातील शाहूनगर मुख्य रस्त्यालगत उघड्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसरातील नागरिक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, ट्रान्सफॉर्मरच्या परिसरातच कचरा टाकून त्याला आग लावण्याचे प्रकार घडत असल्याने हा प्रकार अधिक धोकादायक ठरत आहे.
शाहूनगर परिसर महापालिका हद्दीत येत असून, तेथील काही नागरिकांकडून कचरा कंग्राळी बी.के. ग्रामपंचायत हद्दीत आणून टाकला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गावाच्या हद्दीत कचऱ्याचे ढीग वाढत असून, परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
उघड्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच कचऱ्याला आग लावल्याने धूर निर्माण होऊन परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
ट्रान्सफॉर्मरच्या जवळ कचरा जाळणे ही गंभीर बाब असून, आगीमुळे विद्युत यंत्रणेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, परिसरात नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करावी तसेच कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
महापालिका अधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी या समस्येची तातडीने दखल घेऊन शाहूनगर-कंग्राळी बी.के. परिसरातील कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

