*कर्नाटकातील निकाल भाजपला धक्का*
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे भाजपला धक्का बसला असून काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.काँग्रेसला कर्नाटकात मिळालेल्या यशामुळे काँग्रेस नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास तर वाढलाच आहे.पण या निकालामुळे पुढील काळातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी तर ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती.त्यामुळेच निवडणूक जाहीर होण्या अगोदर पासूनच मोदी आणि शहांचे कर्नाटक दौरे वाढले होते.पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे .तत्पूर्वी काही राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत.त्यामुळे भाजपला कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात पुन्हा सत्ता स्थापन करायची होती पण त्यांचा तो प्रयत्न फसला आहे.कर्नाटकात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी भाजपच्या आता परतीच्या प्रवासाचा आरंभ कर्नाटकातून सुरू झाला आहे असे वक्तव्य केले आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या भारत जोडो यात्रेला कर्नाटकात अभूतपूर्व असा पाठिंबा मिळाला होता.भारत जोडो यात्रेच्या दरम्यान सर्वसामान्य जनतेत मिसळून त्यांच्याशी राहुल यांनी संवाद साधला. कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अगोदर पासूनच काँग्रेस पक्षाने रणनीती आखली.भाजप मधील नाराजाना पक्षात प्रवेश देऊन नंतर त्यांना उमेदवारी दिली.कर्नाटकातील भाजपच्या कारभाराला देखील जनता कंटाळली होती.भाजप सत्तेत असताना तर भ्रष्टाचार पराकोटीचा वाढला होता.भाजपचा भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने प्रचाराच्या वेळी केंद्रस्थानी ठेवला होता.चाळीस टक्के कमिशन सरकार असेच भाजप सरकारला काँग्रेस नेत्यांनी संबोधले होते.काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा देखील मतदारांना आकर्षित करणारा ठरला.मोफत तांदूळ,मोफत वीज,शिष्यवृत्ती,महिलांना पेन्शन आदी जाहीरनाम्या मधील बाबी काँग्रेस पक्षाने प्रचाराच्या वेळी अधोरेखित केल्या.
काँग्रेस सरकार पडवून भाजप सत्तेत आणण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या रमेश जारकीहोळी यांचा तिकीट वाटपात वरचष्मा दिसून आला.त्यांनी आपल्या समर्थकांना तिकीट देण्याच्या नादात भाजप मधील अनेक निष्ठावंतांना त्यांनी नाराज केले.अथणी येथे आपल्या समर्थकाला तिकीट देण्यासाठी त्यांनी लक्ष्मण सवदी यांचे तिकीट कापले.त्यामुळे लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून तिकीट मिळवून निवडणुकीत ते विजयी देखील झाले.रमेश जारकीहोळी आणि ग्रामीण मधील आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात बँकेच्या निवडणुकीच्या राजकारणातून वितुष्ट निर्माण झाले.त्यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवडणुकीत पाडवण्यासाठी रमेश जारकीहोळी यांनी आपल्या समर्थकला उमेदवारी देण्यासाठी आपले वजन खर्च केले आणि उमेदवारी मिळवून दिली.यामुळे भाजप मधील अनेक वर्षे कार्य केलेले कार्यकर्ते नाराज झाले.परिणामी त्यांना पराभव स्विकारावा लागला.
रमेश जारकीहोळी यांचे बंधू कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत.त्यांनी देखील बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारी देण्यात महत्वाची भूमिका बजावली.गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक मतदार संघात त्यांनी अत्यंत शांतपणे गाजावाजा न करता कार्य सुरू ठेवले होते.उमेदवाराची योग्य निवड केल्यामुळे काँग्रेस पक्षाला भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात अठरा पैकी अकरा उमेदवार निवडून आणता आले.काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे भाजपला धक्का तर बसलाच आहे पण पुढील वाटचाल करताना त्यांना कर्नाटकचा पराभव ध्यानात ठेऊन करावी लागणार आहे.