बेळगाव जिल्ह्यातील कटकॊळ पोलिसांनी मोबाईल चोरीच्या मालिकेचा छडा लावत मोठी कारवाई केली असून तब्बल आठ आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. आरोपींकडून विविध कंपन्यांचे ४० मोबाईल फोन तसेच दोन कार असा एकूण १० लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सालहळ्ळी गावातील यात्रेदरम्यान एका शिक्षकाचा महागडा मोबाईल चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. फिर्यादी नीलप्प सन्नतम्मप्प सक्री यांनी २१ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर कटकॊळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवमोग्गा आणि हुबळी परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपी विविध जत्रा, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ४ लाख ९४ हजार २०० रुपये किमतीचे ४० मोबाईल फोन आणि ५ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन कार जप्त केल्या.
या कारवाईत कटकॊळ पोलिस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखा आणि जिल्हा तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे काम केले. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील मोबाईल चोरी करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
