बेळगाव
बेळगाव शहरातील चन्नम्मा नगर परिसरात गुरुवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागात हळहळ व्यक्त होत आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) अधिकारी श्रीशैल चौगुले (वय ३७) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चौगुले बराच वेळ खोलीबाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने एसडीआरएफ जवानांशी संपर्क साधला. जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून कौटुंबिक, मानसिक तणाव तसेच इतर सर्व शक्यतांचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी बीआयएमएस रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाची नोंद उद्योगबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
