बेळगाव | दि. ११
बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार महेश होनुले यांच्या निवडक कलाकृतींचे चित्रप्रदर्शन मुंबईतील काला घोडा परिसरातील ‘द आर्ट एंट्रन्स गॅलरी’ येथे भरविण्यात आले आहे. विविध ठिकाणच्या निसर्गरम्य आणि सांस्कृतिक वातावरणाला आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृती या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरत आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन नॅशनल अवॉर्ड विजेते क्रिएटिव्ह फिल्म डायरेक्टर दीपक एस. व्ही. आणि जगप्रसिद्ध जलरंग चित्रकार विकास पाटणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनात ३० हून अधिक चित्रकृती मांडण्यात आल्या आहेत. महेश होनुले यांनी जलरंग आणि अॅक्रेलिक या माध्यमांतून साकारलेल्या कलाकृतींचा यात समावेश आहे.
कोकणातील निसर्ग, बेळगावचे परिसर, नेपाळची भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये, हंपीचा ऐतिहासिक वारसा, शिमल्याचे निसर्गसौंदर्य, गोव्याचे वातावरण तसेच बदामीच्या ऐतिहासिक वास्तू आणि परिसराची वैशिष्ट्ये या चित्रांमधून कलात्मक पद्धतीने टिपण्यात आली आहेत.
विविध प्रदेशांतील निसर्ग, वास्तू आणि वातावरणाचा अभ्यास करून साकारलेल्या या चित्रांमधून चित्रकार महेश होनुले यांच्या कलादृष्टीची वैविध्यता पाहायला मिळते. जलरंगातील नजाकत आणि अॅक्रेलिक माध्यमातील रंगछटांचा प्रभावी वापर हे या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
हे प्रदर्शन १६ नोव्हेंबरपर्यंत कलारसिकांसाठी खुले राहणार आहे. दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत रसिकांना प्रदर्शनाला भेट देता येणार आहे.
बेळगावच्या कलाकाराने साकारलेल्या कलाकृतींना मुंबईसारख्या कला आणि संस्कृतीच्या केंद्रात व्यासपीठ मिळाल्याने बेळगावच्या कला क्षेत्रासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
D MEDIA NEWS | www.dmedia24.com

