तिलकवाडी पोलिसांनी आनंदवाडी परिसरातील नाथपाई सर्कलजवळील एका घरावर छापा टाकून सुरू असलेला कथित जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळावरून पत्त्यांचा संच आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलै रोजी संबंधित ठिकाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिलकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पूजेरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान आठ जण जुगार खेळताना आढळून आले.
या प्रकरणी सर्व संशयितांविरुद्ध तिलकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 87/2026 नोंद करण्यात आला असून, कर्नाटक पोलीस कायदा कलम 80 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्याची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
