बेळगाव : शहरात अलीकडील काळात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करताना हिरेबागेवाडी पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. पोलिसांनी एका संशयित चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या पाच मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 2 लाख 55 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस आयुक्त भुषण बोरसे, उपायुक्त नारायण भरमणी, उपायुक्त निरंजन राजे अरस आणि ग्रामीण उपविभागाचे एसीपी बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी लक्ष्मण विरुपाक्षी कणबर्गी (वय 31, रा. अडिवेप्पन अंकोलगी, गोकाक तालुका) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा मोटारसायकल चोरीच्या प्रकरणांशी संबंध उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या.
ही कारवाई हिरेबागेवाडी पोलीस निरीक्षक एस. के. होळेन्नवर यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय अविनाश यरगोप्प, पीएसआय बी. के. मिटगार तसेच पोलीस कर्मचारी एम. आय. तुमरी, प्रभाकर भूषी, आर. एस. हाल, एस. केळगिनमणी, महांतेश कडेनवर आणि एम. जी. माणिचार यांच्या पथकाने केली.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.









