बेळगाव शहरातील मारिहाळ पोलिसांनी अवैध जुगारावर मोठी कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ₹23,800 ची रोख रक्कम, पत्त्यांचा संच तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै २०२६ रोजी नागेश भरमशेट्टी यांच्या फार्महाऊसजवळ सार्वजनिक ठिकाणी पैशांवर पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मारिहाळ पोलीस ठाण्याचे पीएसआय मंझुनाथ हुलकुंद आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला.
या कारवाईदरम्यान सहा जणांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. मात्र, आणखी चार संशयित पोलिसांची चाहूल लागताच तेथून पसार झाले. तपासादरम्यान या जुगाराचे आयोजन अन्य एका व्यक्तीकडून करण्यात येत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे.
या प्रकरणी एकूण ११ जणांविरुद्ध कर्नाटक पोलीस कायदा, १९६३ मधील कलम ८७ अंतर्गत मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, ही कारवाई यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मारिहाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथकाचे पोलीस आयुक्त तसेच उपायुक्त यांनी कौतुक केले आहे.
