बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील शंभर वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या शतकोत्तर महोत्सवाला शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय सोहळ्यास आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.
महोत्सवाच्या प्रारंभी एपीएमसी मार्केट यार्ड प्रवेशद्वारापासून भव्य ग्रंथदिंडी व शोभायात्रा काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मराठी संस्कृतीचे वैभव आणि शैक्षणिक परंपरेचा गौरव अनुभवायला मिळाला. भगवे फेटे परिधान केलेले माजी विद्यार्थी, आकर्षक सजवलेली बैलगाडी, छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेतील बालकलाकार, महिलांचे लेझीम पथक, वारकरी दिंडी आणि भगवे ध्वज यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला.
विशेष म्हणजे अनेक दशकांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेशी असलेले ऋणानुबंध व्यक्त केले. या पुनर्मिलनामुळे महोत्सवाला भावनिक रंगही चढला.
यानंतर शाळेच्या मैदानावर उद्घाटन समारंभ पार पडला. शाळेचे माजी विद्यार्थी आणि माजी मुख्याध्यापक टी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, समाजसेवक रमाकांत कोंडुसकर, उद्योजक सी. एम. पाटील, आर. आय. पाटील, संजय मोहनगेकर, ॲड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, विक्रम मुतगेकर, एसडीएमसी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमापूजनाने महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना रमाकांत कोंडुसकर यांनी शिक्षणाच्या सामर्थ्यावर भाष्य करताना, “ही शाळा आमची दुसरी आई आहे. आई-वडील आणि गावानंतर आमची ओळख घडविण्याचे काम या शाळेने केले,” अशा भावना व्यक्त केल्या.
आर. एम. चौगुले यांनी शाळेतील ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर सुविधांचे कौतुक करताना, या शाळेने अनेक यशस्वी विद्यार्थी घडवून त्यांना देश-विदेशात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास सक्षम केले असल्याचे सांगितले.
उद्घाटनानंतर सातारा येथील हॅपी मेडिकेअर इंडियाचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी ‘विद्यार्थी व पालकांचे आरोग्य आणि सर्वांगीण विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात ‘माझ्या यशात शाळेचा वाटा’ या विषयावर माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन होणार असून सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी पहिल्या दिवसाची सांगता होणार आहे.
