बेळगाव : विद्यार्थीदशा ही आयुष्य घडवण्याची सर्वात महत्त्वाची वेळ असून, या काळाचा योग्य उपयोग करून ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा. मोबाईल आणि टीव्हीसमोर अनावश्यक वेळ घालवण्यापेक्षा पुस्तकांशी मैत्री करा आणि भविष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
बेळगाव येथील शिवबसव नगरमधील केपीटीसीएल कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित ‘श्रीराम सेवा संकल्प’ विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आयुष्यात सुरुवातीपासूनच आपले ध्येय निश्चित करावे आणि ते गाठण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी. विद्यार्थी जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करून शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे हेब्बाळकर यांनी सांगितले.
श्रमिक आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या श्रीराम फायनान्सने सामाजिक बांधिलकी जपत मोठी वाटचाल केली आहे. संस्थेचे संस्थापक त्यागराजन यांच्या दूरदृष्टी आणि सेवाभावामुळे संस्थेने मोठी उंची गाठली असून, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मविभूषणसारखा सन्मान मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजच्या काळात सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सातत्याने समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांची गरज आहे. श्रीराम फायनान्सकडून सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही हेब्बाळकर यांनी सांगितले.
पालकांच्या त्यागाची जाणीव ठेवा
प्रत्येक आई-वडिलांची आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे, चांगले आयुष्य जगावे, अशी इच्छा असते. त्यासाठी ते आयुष्यभर कष्ट करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांचे कष्ट आणि त्याग लक्षात ठेवून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
“माझ्या विद्यार्थी जीवनातही मी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाचा स्वीकार केला. त्यांच्या सल्ल्यामुळे आणि आशीर्वादामुळे आजच्या टप्प्यावर पोहोचता आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन स्वतःचे भविष्य घडवावे,” असे हेब्बाळकर म्हणाल्या.
AIच्या युगात स्वतःला अपडेट ठेवा
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थात AIच्या युगात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान, आधुनिक कौशल्ये आणि ज्ञान आत्मसात करत स्वतःला सतत अपडेट ठेवणे आवश्यक आहे. मात्र तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञानवृद्धीसाठी करण्याऐवजी त्यातच वेळ वाया घालवू नये.
मोबाईल आणि टीव्हीसमोर तासन्तास बसण्यापेक्षा वाचनाची सवय लावा. पुस्तके वाचल्याने ज्ञान वाढते, विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते, असा सल्लाही त्यांनी दिला.
यश मिळवलेली प्रत्येक व्यक्ती जन्मतः श्रीमंत किंवा सुखवस्तू नव्हती. अनेकांनी प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि विविध संकटांवर मात करून आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे अपयश आले तरी निराश न होता त्यातून शिकून पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करावेत. शिस्त, सातत्य आणि मेहनत हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.
“मोबाईल बाजूला ठेवा, पुस्तक हातात घ्या” – रवी भजंत्री
बेळगाव क्षेत्र शिक्षणाधिकारी रवी भजंत्री यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापराबाबत सावध केले. “संपत्ती जीवन बदलते, तर गरिबी जीवन जगायला शिकवते,” या विचाराचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांनी अडचणींना घाबरू नये, तर त्यांना संधी मानून पुढे जावे, असे सांगितले.
विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची काळजी घेण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची भावना जोपासावी. मोबाईलचा वापर मर्यादित करून वाचनाला वेळ द्यावा. त्याचबरोबर अभ्यासासोबतच मैदानी खेळांमध्येही सहभागी व्हावे. मोबाईलवर अतिरिक्त वेळ घालवल्यामुळे विद्यार्थ्यांचा मौल्यवान वेळ आणि एकाग्रता दोन्ही बाधित होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला कारंजिमठाचे श्री गुरुसिद्ध महास्वामीजी यांचे सान्निध्य लाभले. काडा अध्यक्ष युवराज कदम, उचगाव ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बाळू देसूरकर, अॅड. संजय कुचनुरे, श्रीराम फायनान्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्रीधर मठ, झोनल हेड रामलिंगेगौडा, एचआर हेड उदय चन्नवर, विजयकुमार पी.जी., शिवानंद सवदत्ती, आदित्य के.ए., ईरन्ना दाडिभावी, विनय चन्नवर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
