बेळगाव - गेली 27 वर्ष सुरू असलेल्या आणि बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला नवी विधायक दिशा देणाऱ्या श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचा समारोप झाला. आज बुधवारी सायंकाळी गुड शेड रोड येथील श्री माता सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या नवरत्न सत्कार सोहळ्यात, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नवरत्नांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
6 सप्टेंबर पासून यावर्षीच्या श्री गणेश फेस्टिवलला सुरुवात झाली होती. गेले तीन दिवस महिलांच्या स्पर्धा तसेच नक्षत्र ग्रुप आयोजित मंगळागौर लोकसंस्कृतीचा कार्यक्रम गणेश भक्तांच्या उदंड प्रतिसाद पार पडले. आज गणेश फेस्टिवलच्या अंतिम दिवशी नवरत्न सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी विविध क्षेत्रातील नवरत्नांमध्ये *समाजसेवक* श्री अवधूत तुडवेकर, *साहित्यरत्न* म्हणून सौ शोभा नायक, *सामाजिक संस्था* समर्पण युथ फाऊंडेशन,*श्रमसेवा* सौ आशा पत्रावळी, *संगीतरत्न* म्हणून श्री अशोक परांजपे,*क्रीडारत्न* म्हणून ललिता गवस, *कलारत्न* श्री अजित औरवाडकर, *उद्योगरत्न* म्हणून आयडियल प्रॉडक्टचे समीर लोकूर,*कृषिरत्न* श्री राजू मर्वे यांना
गणेश फेस्टिवल समितीचे अध्यक्ष मनोहर देसाई, मनोरमा देसाई, रूपाली जनाज, डॉ. मीना पाटील,प्रतिभा नेगिनहाळ, अनुराधा देसाई, श्वेता देसाई,श्रीकांत काकतीकर, मारुती देसाई आदींच्या हस्ते नवरत्नांना शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ,प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सत्कारमूर्तींनी सन्मानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना मनोहर देसाई यांनी, गणेश फेस्टिवल हा संस्कृती जपण्याचा, समाजप्रबोधनाचा उत्सव आहे. समाज एक संघ रहावा यासाठी या व्यासपीठावरून प्रयत्न केले जात आहेत.तळागाळातील लोकांच्या कामाचे कौतुक व्हावे. उपेक्षितांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. यासाठी गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून कार्य सुरू आहे. तसेच नवरत्न सन्मान हा सद्गुणांचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत श्रीकांत काकतीकर यांनी केले.आभार विलास अध्यापक यांनी मानले. सूत्रसंचालन वसुधा सांबरेकर यांनी केले. कार्यक्रमाला श्री माता सोसायटी, श्री राजमाता सोसायटी, श्री भक्ती सोसायटीचे संचालक पदाधिकारी, ज्ञानमंदिर इंग्रजी शाळेच्या शिक्षिका कार्यकारी वर्ग तसेच गणेश भक्तांनी मोठी उपस्थिती दर्शविली.
