महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली शंभर वर्षापूर्वी बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतक महोत्सवाला बेळगावात गुरुवार पासून प्रारंभ झाला.या निमित्ताने शंभर वर्षापूर्वी काँग्रेस अधिवेशन झालेल्या ठिकाणी वीर सौध येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडली.सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी मात्र अधिवेशनाला आले नाहीत.
प्रारंभी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ,राहुल गांधी,कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ,उप मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार आणि काँग्रेस नेते महात्मा गांधी यांची प्रतिमा हातात घेऊन बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले.त्या नंतर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.बैठकीला दोनशे जण उपस्थित होते.बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित काँग्रेस नेते मंडळीना मार्गदर्शन केले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले,प्रणिती शिंदे,सतेज पाटील ,पृथ्वीराज चव्हाण देखील बैठकीला उपस्थित होते.
काँग्रेस अधिवेशनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.वीर सौध येथे उभारण्यात आलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.रामतीर्थ नगर येथे उभारण्यात आलेल्या कर्नाटक सिंह गंगाधर देशपांडे स्मारक आणि फोटो गॅलरीचे उदघाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात आले.सरदार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या खादी प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांनी केले.
काँग्रेस अधिवेशनाच्या निमित्ताने शहरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे.शहरातील काँग्रेस रोड वरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याने शहर झगमगुन गेले आहे.शुक्रवारी सकाळी सुवर्ण सौध येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून दुपारी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा होणार आहे.