मेलबर्न:बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन टीमने सामन्यावर मजबूत पकड घेतली आहे. स्टीव्ह स्मिथ चे दमदार शतक आणि भारताकडून यशस्वी जयस्वाल याची एकाकी लढत हे आजच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावामध्ये सर्व बाद 474 धावा केल्या आहेत. भारताने पहिल्या डावांमध्ये 5 बाद 164 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारत अजूनही 310 धावांनी पिछाडीवर आहे. फॉलोऑन टाळण्यासाठी टीम इंडियाला अजूनही 111 धावा करणे गरजेचे आहे.
खेळाच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 बाद 311 या धावसंख्येवरून खेळायला सुरुवात केली. शुक्रवारी त्यांचा पहिला डाव सर्व बाद 474 धावांवर गुंडाळण्यात आला. भारताकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्यांने चार विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा तीन , आकाशदीपने दोन, तर वाशिंग्टन सुंदर ने एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 140 धावांची दमदार खेळी केली. तसेच सॅम कॉन्स्टास , उस्मान ख्वाजा , मारनेस लाबूसेन , अलेक्स केरी, कमिन्स यांनी देखील चांगली फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यामध्ये सातव्या विकेटसाठी दमदार शतकी भागीदारी झाली.
भारताच्या डावाची घसरगुंडी
भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर आठ धावा लागल्या असताना कर्णधार रोहित शर्मा कमिन्सचा शिकार ठरला. त्याने फक्त तीन धावा केल्या. त्यानंतर जयस्वाल आणि के एल राहुल यांनी डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. कमिन्सने राहुल ला 24 धावांवर बाद करून तंबूत पाठवले.
102 धावांची भागीदारी
यानंतर यशस्वी जयस्वाल आणि अनुभवी विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 102 धावांची भागीदारी केली. त्यामुळे सामन्यात रंगत आली. पूर्णपणे सेट झालेला यशस्वी जयस्वाल मात्र ८२ धावांवर दुर्दैवीपणे धावबाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली देखील 36 धावांवर बाद झाला. आकाशदीप डक घेऊन तंबूत परतला. त्यानंतर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी शिल्लक षटके खेळून काढली. खेळ थांबला तेव्हा ऋषभ पंत सहा आणि रवींद्र जडेजा चार धावांवर खेळत होते. अशारीतीने भारताने पहिल्या डावांमध्ये पाच बाद 164 धावा केल्या आहेत. अजूनही भारत 310 धावांनी पिछाडीवर आहे. टीम इंडियाला फॉलोऑन टाळायचा असेल तर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी संयमी खेळी करणे गरजेचे आहे.
ऑस्ट्रेलियाकडून कमिन्स आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जर टीम इंडियाने हा सामना हरला तर डब्ल्यूटीसी च्या अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न जवळपास संपुष्टात येण्याची शक्यता आहे.