बेळगाव:
बेळगाव तालुका आणि साहित्यिक यांचे अतूट नाते आहे. बेळगाव तालुक्यामध्ये अनेक नामवंत साहित्यिक झाले आहेत. अशा या बेळगाव तालुक्यातील ऐतिहासिक येळ्ळूर गावामध्ये रविवार दि. 5 जानेवारी रोजी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ येळ्ळूर यांच्यावतीने साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
यावर्षी होणारे हे विसावे ग्रामीण साहित्य संमेलन आहे. संमेलन सरकारी मराठी शाळा येळ्ळूरवाडी येथील क्रीडांगणावर, परमेश्वर नगर येळ्ळूर येथे होणार आहे.
संमेलन एकूण पाच सत्रामध्ये संपन्न होणार आहे. सकाळी गावातील प्रमुख मार्गे ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. पहिल्या सत्रामध्ये संमेलनाचे अध्यक्ष जे. एन. यु. दिल्ली येथील डॉ. शरद बाविस्कर यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये पुणे येथील नामवंत विचारवंत दत्ता देसाई यांचे व्याख्यान होणार आहे.
तिसऱ्या सत्रामध्ये लोकशाहीर प्रा. रणजीत कांबळे यांचा एक तास बसा— मनसोक्त हसा — हा विनोदी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सांगोला येथील आबा चव्हाण आणि संदीप मोहिते यांचा जुगलबंदी भारुड हा कार्यक्रम होणार आहे. शेवटच्या सत्रामध्ये मुंबई येथील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची प्रकट मुलाखत होणार आहे.
साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी साहित्य संघाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.