बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात असे झाले मतदान
बेळगाव जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात एकूण ७६.९५ टक्के इतके मतदान झाले.जिल्ह्यात सगळ्यात अधिक ८३.६८ टक्के मतदान अथणी मतदार संघात नोंदवले गेले.बेळगाव उत्तर मतदार संघात सगळ्यात कमी म्हणजे ५९.४४ टक्के इतके मतदान झाले.
संपूर्ण जिल्ह्यात ४४३९ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती .जिल्ह्यात एकूण ३९४७१५० मतदार आहेत.त्यापैकी ३०३७३६८ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.१५५९०७४ पुरुष मतदारांनी तर १४७८२६६ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.अन्य २८ जणांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.
बेळगाव जिल्ह्यातील अठरा मतदार संघातील मतदान यंत्रे बेळगावच्या आर पी डी कॉलेजमध्ये आणण्यात आली आहेत.आर पी डी कॉलेजमध्ये स्ट्राँग रुममध्ये ही मतदान यंत्रे ठेऊन स्ट्राँग रूम सिल करण्यात आल्या आहेत.तेथे पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आर पी डी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार असून मतमोजणीची तयारी देखील पूर्ण झाली आहे प्रत्येक विधानसभा मतदार संघाची वेगवेगळ्या कक्षात मतमोजणी केली जाणार आहे.मतमोजणी कक्षात सगळीकडे सी सी टी व्हि कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील लढतीकडे केवळ कर्नाटकचे लक्ष लागले आहे.भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपले सगळे दिग्गज नेते प्रचारात उतरवले होते.भाजपला रामराम करून काँग्रेस पक्षात गेलेले लक्ष्मण सवदी यांनी कडवे आव्हान उभे केले आहे तर बेळगाव दक्षिण,उत्तर,ग्रामीण ,खानापूर आणि यमकनमर्डी मतदार संघात समितीने आपले उमेदवार उभे केले आहेत.बेळगाव दक्षिण ,उत्तर आणि ग्रामीण मतदार संघात निवडून कोण येणार याची उत्सुकता नेते मंडळी बरोबरच सर्वसामान्य जनतेला लागून राहिली आहे.निवडून कोण येणार यावर पैजाही लागल्या आहेत.
बेळगाव मतदार संघात महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचार आणि रणनीती आखण्यासाठी बेळगावात तंबू ठोकला होता.तेरा मे रोजी मतमोजणी होणार असून दुपार पर्यंत अठरा विधानसभा मतदार संघाचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.