बेळगाव : डी मीडिया
बेळगाव उत्तर मतदारसंघातील ओल्ड गांधी नगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे. आमदार राजू आसिफ शेठ व अमान शेठ यांच्या हस्ते भूमिपूजन करून UGD, गटार आणि रस्ता कामांना चालना देण्यात आली.
या परिसरात सांडपाणी व्यवस्थेसाठी UGD लाईन तसेच गटारांची आवश्यकता असल्याची मागणी स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार परिसरातील मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.
याअंतर्गत 3.5 किलोमीटर UGD लाईन, 2.5 किलोमीटर गटार बांधकाम आणि 2.5 किलोमीटर रस्ता विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार राजू आसिफ शेठ यांनी संबंधित कंत्राटदाराला काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कामाचा दर्जा योग्य राखून नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनी विकासकामांना सुरुवात झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
