बेळगाव : विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या उचगाव विभागीय क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा आंबेवाडी येथील भगतसिंग हायस्कूलच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी अतिवाडकर होते.
या उद्घाटन सोहळ्यास युवा नेते आर. एम. चौगुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच भाग्यलक्ष्मी सोसायटीचे चेअरमन अनिल अतिवाडकर, संचालक मंडळातील पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून एस. डी. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षणाबरोबरच खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी क्रीडा क्षेत्रातून शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होत असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक वाय. एम. पाटील, अमोल पाटील, बी. के. कंग्राळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
विभागीय स्तरावरील या क्रीडा स्पर्धांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. उद्घाटनानंतर विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींमध्ये स्पर्धांबाबत मोठा उत्साह पाहायला मिळाला.
