शहरातील उद्यमबाग पोलिसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा यशस्वी तपास करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून ₹65 हजार किमतीच्या दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुप्रसाद नगर, कावेरी नगर येथील गणेश मंदिरासमोर उभी असलेली होंडा डिओ (KA-05-EW-5831) ही दुचाकी 17 जुलै रोजी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार उद्यमबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
पोलीस निरीक्षक महांतेश व्ही. होसपेटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यू. बी. कट्टीकर, पी. बिरादार आणि त्यांच्या पथकाने तपासादरम्यान दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
तपासात त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली होंडा डिओ (KA-05-EW-5831) तसेच आणखी एक KA-24-S-2395 क्रमांकाची दुचाकी असा एकूण ₹65 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अल्पवयीनांविरुद्ध बाल न्याय कायद्यानुसार आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.
