बेळगाव :
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथील विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावरील स्पेल बी स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत शाळेचा गौरव वाढवला आहे.
इयत्ता पाचवी ‘ब’ मधील विद्यार्थिनी अन्शाराह शोएब मुल्ला हिने आपल्या उत्तम शब्दलेखन कौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर WIZ International Spell Bee या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.
विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतेला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अन्शाराहने आत्मविश्वासाने सहभाग घेत आपली गुणवत्ता सिद्ध केली. तिच्या या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांकडे पाहण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.
शाळेचे प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक आणि स्पर्धात्मक उपक्रम राबवले जात आहेत.
अन्शाराहच्या यशाबद्दल प्राचार्य, शिक्षकवृंद आणि पालकांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
