दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि कलात्मक सर्जनशीलतेला वाव देणारे ‘स्पेक्ट्रम’ (विज्ञान) आणि ‘आकार’ (कला) प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रा. एम. बी. निर्मळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला किरण यांनी मान्यवरांचे स्वागत करत प्रदर्शनामागील संकल्पना मांडली. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रा. आर. एस. पाटील तसेच प्राचार्या सौ. सोनाली कंग्राळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित प्रयोग, मॉडेल्स आणि नवकल्पना सादर केल्या. त्याचबरोबर ‘आकार’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमधून रंग, रेखाटन, शिल्प आणि सर्जनशीलतेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला.
यावेळी बोलताना मान्यवरांनी, “विज्ञान हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तार्किक विचार करण्याची पद्धत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित होते,” असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळणारे हे व्यासपीठ कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रदर्शनास पालकांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला मिळालेला हा प्रतिसाद शाळेतील शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची गुणवत्ता अधोरेखित करणारा ठरला.
Also read









