बेळगाव :
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानी झालेली ईडीची कारवाई सध्या राजकीय प्रेरित असल्याचे म्हणता येणार नाही. या प्रकरणातील वास्तविक चित्र काही महिन्यांनंतर स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडीच्या कारवाईमुळे आपल्यालाही चिंता वाटत असल्याचे सांगत त्यांनी डॉ. मंजुनाथ हे आपल्या परिचयातील असून, मोठ्या अधिकाऱ्यावर झालेली ही कारवाई गंभीर बाब असल्याचे नमूद केले.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेली ही मोठी कारवाई असल्याचे सांगत जारकीहोळी म्हणाले की, तपास यंत्रणा कोणत्या आधारावर माहिती घेत आहे हे पुढील काळात स्पष्ट होईल.
यापूर्वी डॉ. मंजुनाथ यांच्याविरोधात २०११ मध्ये एक प्रकरण नोंदवण्यात आले होते, मात्र ते प्रकरण रद्द झाल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यांच्या कुटुंबाचा गेल्या अनेक वर्षांपासून मद्य व्यवसायाशी संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले.
ईडी कारवाईमागे राजकीय हेतू आहे का, याबाबत आत्ताच निष्कर्ष काढता येणार नाही. आगामी काळात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा कारवायांवर राजकीय चर्चा होणे स्वाभाविक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पालकमंत्री नियुक्तीबाबत स्पष्टीकरण
बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्तीला झालेल्या विलंबाबाबत बोलताना जारकीहोळी यांनी सांगितले की, राज्यात अद्याप अधिकृतपणे जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपात जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
केपीसीसी अध्यक्षपदावरही भाष्य
केपीसीसी अध्यक्षपद न मिळण्यामागे मुख्यमंत्री सिद्धरामय्या जबाबदार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना जारकीहोळी यांनी हे वृत्त फेटाळले.
काँग्रेसच्या ‘एक व्यक्ती – एक पद’ या धोरणानुसार हा निर्णय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष नेतृत्वाकडून अध्यक्षपदाबाबत चर्चा झाली होती, मात्र मंत्रीपद आणि पक्षाध्यक्षपद एकाच वेळी सांभाळण्याची शक्यता नसल्याने आपण मंत्रीपदावर कायम राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
