मन्नूर येथील मातोश्री सोहार्द सहकारी संघ (सोसायटी) यांच्या वतीने नवनिर्वाचित शाळा सुधारणा कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. मातोश्री सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आर. एम. चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित शाळा सुधारणा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा व सदस्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्यासाठी कमिटीने सक्रियपणे काम करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
‘शाळेचा विकास म्हणजे गावाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी’ या भावनेतून शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थ, शाळा सुधारणा कमिटी आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
नवनिर्वाचित शाळा सुधारणा कमिटीमध्ये अध्यक्ष म्हणून कल्लाप्पा तरळे, तर उपाध्यक्ष म्हणून गंगा प्रताप सांबरेकर यांची निवड झाली आहे. तसेच चाळोबा कोल्हापरे, महादेव मीनाजी चौगले, महेश मा. पुजारी, लक्ष्मण ना. चौगुले, भाऊ चौगले, स्नेहल होनरोकर आणि रेखा कदम यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.
कार्यक्रमाला मातोश्री सोसायटीचे संचालक, सल्लागार तसेच शाळा सुधारणा कमिटीचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
नवनिर्वाचित कमिटीच्या पुढील कार्यकाळासाठी मातोश्री सोसायटीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेच्या विकासाला प्राधान्य देत प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
