चंदगड : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘आयडॉल शिक्षक’ सन्मानासाठी निवड झाल्याबद्दल दि. न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथील सहाय्यक शिक्षक संजय गोपाळ साबळे यांचा चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने सपत्नीक सत्कार करून गौरव करण्यात आला.
संजय साबळे यांनी आपल्या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे. केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञान न देता विद्यार्थ्यांमधील वाचनसंस्कृती, वक्तृत्व, लेखनकौशल्य, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव विकसित व्हावी, यासाठी ते सातत्याने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात.
विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी निर्माण व्हावी, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जावा, हा त्यांच्या अध्यापनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यांच्या याच विद्यार्थी केंद्रित आणि प्रयोगशील शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेत ‘आयडॉल शिक्षक’ सन्मानासाठी त्यांची निवड झाली आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे संचालक एम. एन. शिवणगेकर यांनी आपल्या मनोगतात, "शिक्षकाचे खरे यश हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात दडलेले असते. संजय साबळे यांनी अध्यापनाबरोबरच साहित्य, वाचन चळवळ आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड निर्माण केली आहे. त्यांना मिळालेला आयडॉल शिक्षक सन्मान हा त्यांच्या सातत्यपूर्ण, निष्ठापूर्ण आणि कल्पक कार्याचा गौरव असल्याचे सांगितले."
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे समन्वयक रविंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतात, "शिक्षकाने स्वतः सतत शिकत राहिले पाहिजे आणि काळानुसार अध्यापनात बदल स्वीकारले पाहिजेत. संजय साबळे हे अध्यापन, साहित्यनिर्मिती आणि विद्यार्थी विकास या तिन्ही क्षेत्रांत सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्राचा गौरव वाढला असून, हा सन्मान तालुक्यातील शिक्षकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे," असे मत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना संजय साबळे यांनी, "हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझ्या शाळेचा, सहकारी शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि माझ्या शैक्षणिक प्रवासात वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचा आहे. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणे आणि त्यांना आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे जाण्यास सक्षम बनविणे हेच माझे ध्येय आहे. सहकाऱ्यांनी केलेला हा प्रेमपूर्ण सत्कार माझ्यासाठी आनंददायी आणि अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे, "अशा भावना व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.
या प्रसंगी केंद्रप्रमुख आप्पाराव पाटील, सौ. अश्विनी पाटील, संध्या साबळे,रविंद्र पाटील, महादेव शिवणगेकर, मोहन पाटील, आनंद पाटील, बाबूराव पाटील, हणमंत पाऊसकर, संजय पाटील, राजेंद्र शिवणगेकर, कमलेश कर्निक यांच्यासह मराठी अध्यापक संघाचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

