बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईचा निषेध करत काँग्रेसकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील हिरेबागेवाडी येथील बसवेश्वर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. एसटी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष परशुराम पिराजी पुजारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी ईडीच्या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय हेतूने वापर केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तपास यंत्रणांनी निष्पक्षपणे काम करावे आणि राजकीय दबावासाठी त्यांचा वापर होऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात निंगाप्पा तळवार, एसी ब्लॉक अध्यक्ष यल्लाप्पा तळवार, गंगाप्पा मस्तमरडी यांच्यासह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनाला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद
परशुराम पुजारी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनाला स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकार आणि ईडीच्या कारवाईविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यातील इतर भागांतही काँग्रेसकडून ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यात येत असल्याचे चित्र आहे. जारकीहोळी कुटुंबाशी संबंधित ठिकाणी झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे कर्नाटकातील राजकीय चर्चेला वेग आला आहे.
मात्र, ईडीच्या कारवाईत नेमके काय निष्पन्न झाले, याबाबत अधिकृत तपशील समोर येणे बाकी आहे. त्यामुळे पुढील काळात तपास यंत्रणेकडून कोणती माहिती समोर येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
