बेळगाव | बैलहोंगल
बैलहोंगल तालुक्यातील माटोळी क्रॉस परिसरात चित्त्याचा वावर आढळून आल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्त्याच्या हालचाली कैद झाल्याने या घटनेला दुजोरा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्ता माटोळी क्रॉस परिसरातून जाकवेलच्या दिशेने गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्येही चिंता वाढली असून शेतात जाण्यासाठी अनेकजण धास्तावत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात चित्त्याचा वावर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याच्या हालचाली स्पष्टपणे दिसून आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये अधिकच भीती निर्माण झाली आहे.
शेतकरी आणि ग्रामस्थांच्या दैनंदिन कामांवरही याचा परिणाम होत असून, शेतात जाणे, पहाटे किंवा सायंकाळच्या वेळी परिसरातून ये-जा करणे धोकादायक ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी.
चित्त्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे.
ही घटना बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
