समाजातील श्रवणदोष असलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऑडिओमेट्री श्रवण तपासणी व हिअरिंग एड वितरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन अॅड. विजयलक्ष्मी मन्निकेरी आणि सचिव रोटेरियन कावेरी करूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवा उपक्रम पार पडला. शिबिराच्या नियोजन व अंमलबजावणीत रोटेरियन सविता वेस्ने यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
शिबिरात उपस्थित नागरिकांची आधुनिक ऑडिओमेट्रीद्वारे श्रवण तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरज असलेल्या लाभार्थ्यांना हिअरिंग एडचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांना पुन्हा प्रभावी संवाद साधण्याची संधी मिळाली असून त्यांच्या आत्मविश्वासात आणि दैनंदिन जीवनाच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या सेवा प्रकल्पाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबतर्फे सहाय्यक गव्हर्नर रोटेरियन उदय जोशी यांचे वर्षभर मिळालेल्या मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रोत्साहनाबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले. तसेच शिबिरात सहभागी झालेल्या सर्व लाभार्थ्यांनी दाखविलेल्या विश्वास आणि सहकार्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
याशिवाय रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे अध्यक्ष रोटेरियन शशिकांत नाईक, रोटेरियन अरविंद खडाबडी, रोटेरियन बंकट पवार आणि रोटेरियन किशोर जगदाळे यांनी या सामाजिक उपक्रमासाठी दिलेल्या सहकार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना अध्यक्षा रोटेरियन अॅड. विजयलक्ष्मी मन्निकेरी म्हणाल्या, "ऐकण्याची क्षमता ही माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची देणगी आहे. संवाद, नाती आणि सामाजिक सहभाग अधिक सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. या शिबिराच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न असून समाजसेवेची रोटरीची परंपरा यापुढेही अशाच उपक्रमांतून कायम ठेवली जाईल."
