भारत सरकारच्या मेक इन इंडिया व मेड इन इंडिया या संकल्पनांचा प्रचार आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने बेळगाव जिल्ह्यातील कणगला गावचा युवक मेघदूत बाळासाहेब गोंधळी हा बेळगाव ते तिरुपती असा दीर्घ सायकल प्रवास करत आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याला सुमारे नऊ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे केलेले आवाहन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावे, या प्रेरणेतून मेघदूत गोंधळीने हा उपक्रम हाती घेतला आहे. प्रवासादरम्यान विविध ठिकाणी मेक इन इंडिया संकल्पनेचा संदेश तो जनतेपर्यंत पोहोचवत आहे.
नुकतेच मेघदूत गोंधळीचे बेळगाव शहरात आगमन झाले. यावेळी बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन तर्फे त्याचा सन्मान करण्यात आला. असोसिएशनचे स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते हार, शाल व स्मृतिचिन्ह देऊन त्याचा सत्कार करण्यात आला तसेच पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर रोहन कोकणे, समाजसेवक शिवशंकर मल्लूर, विश्वनाथ येळ्ळूरकर, अथर्व येळ्ळूरकर यांच्यासह बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स, पालकवर्ग व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेघदूत गोंधळीचा हा उपक्रम तरुणांसाठी प्रेरणादायी असून स्वदेशी विचारधारेकडे समाजाचे लक्ष वेधणारा ठरत आहे.
Also read









