बेळगाव, २५ ऑगस्ट २०२६ : बेळगावच्या शहरी विकासाला दिशा देणाऱ्या महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदावर आता बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या नगरविकास विभागाने मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी याबाबत अधिकृत आदेश जारी केला.
यापूर्वी लक्ष्मणराव चिंगळे हे बेळगाव अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात BUDAच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या जागी आता आसिफ राजू सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्नाटक अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज अॅक्ट, १९८७ मधील कलम ३(३)(अ) आणि ३(४) अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आल्याचे शासन आदेशात नमूद आहे. नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून, राज्य सरकारकडून पुढील आदेश जारी होईपर्यंत सेठ हे BUDA अध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत.
बेळगावच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी
BUDAकडे बेळगाव शहराच्या नियोजनबद्ध विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे आहेत. शहराचा विस्तार, रस्ते, नागरी सुविधा, विकास आराखडे आणि भविष्यातील शहरी नियोजनाच्या दृष्टीने प्राधिकरणाची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
सध्या बेळगाव शहरासह आसपासच्या ५५ गावांचा समावेश असलेल्या नव्या मास्टर प्लॅनच्या तयारीचे काम चर्चेत आहे. त्यामुळे BUDAच्या अध्यक्षपदी झालेला हा बदल आगामी शहरी विकासाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
आमदार आसिफ राजू सेठ यांच्याकडे आता BUDAच्या माध्यमातून शहराच्या विकासाशी निगडित महत्त्वाच्या निर्णयांची जबाबदारी आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बेळगावच्या आगामी नागरी नियोजनाला कोणती दिशा मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
