बैलहोंगल तालुक्यातील हिरेबुदनूर येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री सद्गुरू संत बाळूमामा (आज्जा) जत्रा महोत्सव व लक्षदीपोत्सव 24 ते 26 जुलै 2026 या कालावधीत मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने धार्मिक विधी, पालखी सोहळा, लक्षदीपोत्सव, भजन, महाप्रसाद आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, 24 जुलै रोजी सकाळी होमहवन, रुद्राभिषेक, विशेष पूजा आणि श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे.
शनिवार, 25 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री बाळूमामा देवस्थानातून येणाऱ्या मेंढ्यांच्या कळप क्रमांक 6 चे हिरेबुदनूर येथे आगमन होणार आहे. हा कळप श्री नागाप्पा ल. मिजी यांच्या नेतृत्वाखाली येणार असून, श्री बाळूमामांनी प्रेमाने पालन केलेल्या घोड्याच्या पाचव्या पिढीतील घोड्याची उपस्थिती हे यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
यंदा आदमापूर देवस्थान ट्रस्टतर्फे उत्कृष्ट मेंढीपालनाबद्दल कळप क्रमांक 6 ला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने या कळपाचे विशेष स्वागत करण्यात येणार आहे.
सायंकाळी 6 वाजता परिसरातील विविध गावांतील देवतांच्या पालख्यांचे आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता भव्य लक्षदीपोत्सव साजरा केला जाणार असून, भजन, ढोल-ताशे आणि प्रसाद वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रविवार, 26 जुलै रोजी सकाळी रुद्राभिषेक, होमहवन, विशेष पूजा, सर्व देवी-देवतांची पूजा तसेच बाळूमामांच्या मेंढ्यांच्या कळपाची पूजा करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री बाळूमामा देवस्थान ट्रस्ट, हिरेबुदनूर यांनी सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्री बाळूमामांचे दर्शन, आशीर्वाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
