बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता ग्रामीण भागालाही बसू लागला आहे. खानापूर तालुक्यातील शिवोली येथे धावत्या ट्रॅक्टरवर अचानक मोठे झाड कोसळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेत चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. क्षणार्धात घडलेल्या या प्रकारात चालक थोडक्यात बचावला, मात्र ट्रॅक्टरच्या इंजिनचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
सदर ट्रॅक्टर हा पुंडलिक पाटील यांचा असल्याचे समजते. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत झाड बाजूला करून रस्ता मोकळा केला. त्यामुळे पुढील अडथळा दूर करण्यात आला.
ही घटना खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि झाडांच्या परिसरात विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
