अनादिकाळापासून चालत आलेल्या अवधूत संप्रदायाला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणारे दत्तावतारी व प्रेमावतारी संत श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचा १२१ वा पुण्यतिथी उत्सव २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान श्री क्षेत्र पंतबाळेकुंद्री येथे विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता बेळगाव येथील श्रीपंत वाडा, निघेल. दुपारी २ वाजेपर्यंत ही मिरवणूक श्री क्षेत्र पंतबाळेकुंद्री येथील पंतवाड्यात पोहोचेल. सायंकाळी ५ वाजता पंतवाड्यातून प्रेमध्वज मिरवणूक निघून रात्री ८ वाजता प्रेमध्वजारोहण होईल. यानंतर उत्सवाला प्रारंभ होणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता श्रीपुण्यस्मरण कार्यक्रम होईल. त्यानंतर गावातील पंतवाड्यातून पालखी मिरवणूक निघून दुपारी आमराईतील श्रीपंतस्थानी पोहोचेल. रात्री ८ ते १२ या वेळेत पालखी सेवा होईल. उत्सवाच्या सांगता दिनी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता श्रींचा महाप्रसाद होईल. दुपारी ३ ते ५ या वेळेत प्रेमानंद टिपरी कार्यक्रम होईल. सायंकाळी ६ वाजता श्रींची पालखी आमराईतील पूज्यस्थानी जाईल आणि त्यानंतर गावातील श्रीपंत वाड्यात पालखी पोहोचल्यावर उत्सवाची सांगता होईल. सर्व भक्तांनी उत्सवात सहभागी होऊन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष श्री राजन पंतबाळेकुंद्री,श्री दत्त संस्थान, पंतबाळेकुंद्री व उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

