बेळगाव : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बेळगावातील नऊ मान्यवरांचा आज श्री गणेश फेस्टिव्हलच्या सांगता सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
श्री माता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, श्री भक्ती महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, श्री राजमाता महिला मल्टीपर्पज सोसायटी आणि ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश फेस्टिव्हल बेळगाव 2026 चा सांगता समारंभ आज, बुधवार दि. 9 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.
या सोहळ्यामध्ये समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची ‘बेळगाव नवरत्न’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
यंदाच्या नवरत्न पुरस्कारासाठी समाजसेवक म्हणून अवधूत तुडवेकर, साहित्यरत्न म्हणून सौ. शोभा नायक, सामाजिक संस्थेच्या श्रेणीत समर्पण युथ फाऊंडेशन, तसेच श्रमसेवा क्षेत्रासाठी सौ. आशा पत्रावळी यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय संगीतरत्न म्हणून श्री अशोक परांजपे, क्रीडारत्न म्हणून ललिता गवस, कलारत्न म्हणून श्री अजित औरवाडकर, उद्योगरत्न म्हणून आयडियल प्रॉडक्ट आणि कृषिरत्न म्हणून श्री राजू मर्वे यांना गौरविण्यात येणार आहे.
या सर्व मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा विशेष सत्कार सोहळा श्री माता सोसायटी सभागृह, न्यू गुड्स शेड रोड, बेळगाव येथे सायंकाळी 4 वाजता होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या उपक्रमांमुळे चर्चेत असलेल्या श्री गणेश फेस्टिव्हलचा हा सांगता सोहळा यंदाही विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची अपेक्षा आहे.
