बेळगाव - मराठ मोळ्या पारंपरिक संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेल्या मंगळागौरीचा उदंड उत्साह आज बेळगावात गणेश फेस्टिवलच्या व्यासपीठावर पाहायला मिळाला.नक्षत्र ग्रुपच्या महिलांनी पारंपरिक पद्धतीने मंगळागौरीची गीते आणि घागर, झिम्मा, फुगडी खेळांनी सर्वांना समृद्ध लोक परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविले.
आज मंगळवारी गणेश फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी नक्षत्र ग्रुप बेळगाव वतीने मंगळागौर कार्यक्रम सादर करण्यात आला. कै. स्मिता पाठक यांच्या मंगळागौर संकल्पनेला पुढे नेण्याचे काम प्राजक्ता बेडेकर यांनी चालविले आहे. नक्षत्र ग्रुपच्या पारंपारिक वेशभूषने नटलेल्या भगिनींनी गणेश फेस्टिवल च्या व्यासपीठावर सर्वप्रथम गणेश स्तवन आणि देवीचा जागर सादर करून सर्वांची मने जिंकली.
नऊवारी साडी, नाकात नथ आणि पारंपरिक दागिने परिधान करून आलेल्या महिला भगिनींनी वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी,आगोटा-पागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम-पडवळ घुम, दिंड आणि घोडा असे अनेक खेळ खेळत सर्वांची मनमुराद दाद मिळविली.
मंगळागौर हा केवळ एक सांस्कृतिक प्रकारच नसून पारंपरिक खेळांमुळं शरीराच्या विविध अवयवांना हालचाल मिळते. त्यातून व्यायामही होतो. पूर्वीच्या काळात घरातील कामांमध्ये व्यस्त असलेल्या महिलांसाठी हे खेळ आनंद, मनोरंजन आणि एकत्र येण्याचे महत्त्वाचे माध्यम होते याचा प्रत्यय आजच्या कार्यक्रमातून प्रकर्षाने दिसून आला. गणेश फेस्टिवल च्या व्यासपीठावर मंगळागौर कार्यक्रम उत्सव श्रद्धा, परंपरा आणि आनंद यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
उद्या बुधवारी ठीक चार वाजता गुड्स रोड येथील श्रीमाता सभागृहात नवरत्न सन्मानासह यावर्षीच्या श्री गणेश फेस्टिवल समारोप होणार आहे.









